आधुनिक शेतकरी आपल्या देशाची प्रगती झाली आहे. मोठमोठ्या परदेशी कंपन्यांनी आपला उत्कर्ष व भरभराट पाहून त्यांचा संसार इथेच थाटलाय. मोठ्या इमारती, मोठे पगार, मोठ्या गाड्या, सर्वकाही मोठ्या प्रमाणात होत आहे. माणसाला सुखसोयी, चांगली राहणी आणि खूप काही मिळत आहे. पण आज त्याच माणसाकडे थोडासाही वेळ उरला नाही. शहरात राहत असलेल्यांना गावची ओढ नाही आणि ओढ असली तरी तिथे जायला वेळ नाही. त्यामुळे नव्या पिढीला गावचे घर, शेती, गोठे, गावाकडचे जेवण, प्रथा काहीच माहीत नाहीत. हिंदी सिनेमात हीरो-हिरॉईन शेतात नाचतात एवढाच संबंध या शहरातल्या मुलांचा शेताशी राहिला आहे. गंमत म्हणजे टी.व्ही.वरील एका कार्यक्रमात एका छोट्या मुलीला विचारले, ‘‘आपल्याला भात कुठून मिळतो?’’ तर तिने म्हटले बिग बाझार किंवा अपना बाझारमधून. त्यावर तिला हेही विचारले गेले की, त्या बाजारात कुठून येतो तर तिचे उत्तर होते ‘तिथेच बनवतात बहुतेक!’ पण यात या पिढीचा फारसा दोष नाही. जे पाहिलेच नाही ते कळेल तरी कसे. अन्न वाया घालवू नका असे सर्व पालक आपल्या मुलांना सांगतात, पण ते अन्न तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात किती कळा लागतात हे ज्यांना माहीतच नाही त्यांना अन्नाचे मोल कळेल तरी कसे. आणि मग यांनीच पुढे जाऊन शेतकर्यांची दु:खं समजावी अशी अपेक्षा करणे चुकीचेच नाही का? आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. शेतीमुळेच आपल्या देशाला मंदीचा जास्त फटका बसला नाही. त्यामुळे या पिढीच्या अज्ञानाकडे दुर्लक्षित करून चालणारच नाही. ‘‘पण मग काय करता येईल?’’ असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर एक फार आनंदाची गोष्ट सांगतो , ‘‘ज्यांना गाव किंवा गावचे घर नाही, ज्यांना कांदा झाडाला लागतो की जमिनीतून येतो हे माहीत नाही, ज्यांना ‘आमची माती आमची माणसं’ हा कार्यक्रम का दाखवला जातो असा प्रश्न सतत पडतो, ज्यांना शेतकरी आत्महत्या का करतात माहीत नाही, ज्यांना शेतातल्या ताज्या भाज्या, शेतकरी किंवा शेतीशी काही संबंध नाही, त्यांना अज्ञानातून ज्ञानाकडे वळवण्याचे काम करत आहेत पांडुरंग तावरे. त्यांचे कार्य ऐकून तर पांडुरंगाने पंढरपुरातून बारामतीला ‘ट्रान्सफर’ घेतली असावी असेच मला वाटले. पांडुरंग तावरे हे बारामतीचे रहिवासी व बी.एस.सी. (कॉम्प्युटर सायन्स)चे पदवीधर. त्यांची व त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी कृषिविषयक पदवी मिळवावी, पण कमी मार्क पडल्यामुळे तसे जमले नाही. शिक्षण झाल्यावर डेटा एण्ट्रीच्या कामाशिवाय दुसरे कोणतेही काम मिळत नव्हते. रु. 600 दर महिना मिळकत. थोडा काळ गेल्यावर त्यांनी युरेका फोर्ब्समध्ये सेल्समनचे काम स्वीकारले. घरोघरी व्हॅक्युम क्लिनर व कूलर विकले. जवळजवळ तीन वर्षें सतत हीच रुपये 950 ची नोकरी करून त्यांचे मन लागत नव्हते. 21व्या वर्षी लग्न केले व स्टर्लिंग रिसॉर्टचे काम हाती घेतले. चार वर्षे तेथे काम केले. टूरिझमचा चांगला अनुभव इथूनच सुरू झाला. त्यानंतर क्लब महिंद्रामध्ये नोकरी केली. पुण्यातील वासेकॉन इंजिनीयर्समधील त्यांची शेवटची नोकरी. शेती करण्याचा जुना विचार सारखा मनात फिरत असतानाच नोकरी सोडायचे त्यांनी ठरवले. प्रागतिक शेतकरी होणे हे त्यांचे जुने स्वप्न होते. टूरिझमचा अनुभव आणि शेतीत अडकलेला जीव या दोन्हींचे मीलन कसे करावे या विचारात गुरफटलेले असतानाच त्यांना एक संकल्पना सुचली. त्या संकल्पनेचे नाव आहे ‘ऍग्री टूरिझम’. आपण सुट्ट्यांसाठी कश्मीर, केरळ, महाबळेश्वर, माथेरान किंवा परदेशात युरोप, अमेरिकेला जातोच. पर्यटन संस्था जे पॅकेज देतात त्यातले एखादे निवडतो. मग आपण गावाकडे त्याच सर्व सुविधा दिल्या व गावची माहिती दिली, जेवण, खेळ व नवीन अनुभव दिला तर यालाही पर्यटनच म्हणता येईल. असा जन्म झाला पांडुरंग तावरे यांच्या कृषी व ग्रामीण पर्यटनाचा. तावरे म्हणतात, ‘‘मातीची नाळ कधी तुटत नाही. मी याच मातीशी नव्याने ओळख करून देतो.’’ संकल्पनेचा संपूर्ण अभ्यास करून तावरेंनी शरद पवारांची भेट घेतली व त्यांची संकल्पना समजावत पवारांनी त्यांना विचारले, ‘‘इथे लोक गावचे जीवन बघायला येतील का?’’ त्यावर तावरेंनी ‘माझ्यावर विश्वास ठेवा’ एवढे म्हणून काम सुरू केले. बारामती कृषी विकास प्रतिष्ठानच्या 110 एकर जागेवर या संकल्पना ऑक्टोबर 2005 मध्ये अमलात आणली. महिनाभर तयार्या, चाचण्या सर्व करून 1 नोव्हेंबर 2005 मध्ये जाहीर केले. पुण्यात छान सजवलेल्या बैलगाड्यांवर बसून नटूनथटून मुलांनी व मुलींनी या संकल्पनेची माहिती देणारी पत्रके वाटली. तो देखावा पाहून उत्सुकता आधीच वाढली होती. लोकांची व त्यातून पत्रकातील माहिती वाचून तर सर्वच खूश झाले होते. संकल्पना अशी आहे की गावच्या शेतांवरील थोडा भाग वेगळा काढून चांगल्या खोल्या बांधल्या जातात. स्वच्छ राहण्याची सोय, गावाकडची चव व प्रेम जिभेला लावणारे जेवण, शेतात फिरण्याची संधी, शेती व अनेक प्रकारच्या उत्पन्नाची माहिती, गावचे खेळ बैलगाडीवर फेरफटका हे सर्व काही आपल्याला करता येते. तावरेंनी मला विचारले, ‘‘तुम्ही कधी शेतात राहिला आहात का? पळून कोंबड्या पकडल्या आहेत का? भवरा खेळला आहात का? नाही ना मग सहकुटुंब या आणि हे अनुभव घ्या.’’ गावोगावी फिरून अनेक शेतकर्यांपर्यंत आज ही संकल्पना तावरेंनी पोहोचवली आहे. शेतीतून फारसे पैसे मिळत नसलेल्या शेतकर्यांसाठी हे कमाईचे दुसरे साधन ठरले आहे. एका वर्षात 40 हजार पर्यटक मालेगावमधील या कृषी पर्यटन स्थळाला भेट देऊन गेले. ‘‘शेतकरी म्हटले की अडाणी, बिनडोक असे आजही समजले जाते’’ असे ते सांगतात. शेतकर्यांच्या मुलांना लग्नाला मुली कुणी सहज देत नाही. पावसावर निर्भर राहणार्यांशी लग्न नको म्हणणार्यांनी ग्रामीण पर्यटन पाहून मत बदलले आहे. शेतकर्यांची मुले जी शहराकडे पळून जात होती ती आज शेतावर राहून ‘ऍग्रो टूरिझम’ करून घर चालवतात. प्रत्येक पर्यटकाचे पारंपरिक स्वागत केले जाते व त्यांना आपल्याच घरी आल्यासारखा अनुभव मिळतो. इथून गेलेला कुणीही भाजी मार्केटमध्ये कांदा-टोमॅटोचा भाव करणार नाही. 150 शेतकर्यांना तावरेंनी हा उपक्रम सुरू करून दिला आहे. सोलापूरचे राजू असो किंवा मोरगावचे सुनील भोसले यांचे आयुष्य पांडुरंगाच्या कृपेनेच बदलले असे ते समजतात. पारंपरिक शेतीला कृषी व ग्रामीण पर्यटनाची जोड देऊन ग्रामीण विकासाला चालना देतानाच शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याची संधी पांडुरंग तावरेंच्या कृषी पर्यटन विकास संस्थेमुळे काही वर्षांपासून मिळवून दिली. तावरेंना याच नावीन्यपूर्ण पर्यटन संकल्पनेसाठी रा्रीय पर्यटन पुरस्कार देण्यात आला. याच वर्षी हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी ‘16 मे’ हा दिवस कृषी पर्यटन दिवस म्हणून जाहीर केला व त्यांनी दखल घेतल्यामुळे UNWT या संघटनेने या दिवसाला जागतिक मान्यता दिली आहे व जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून जाहीर केले आहे. लहान मुलांचे व मोठ्यांचे कॅम्पवर आल्यावरचे प्रश्न ऐकून व त्याची उत्तरे त्यांना सविस्तरपणे देऊन त्यांनी ही संकल्पना सार्थकी लागल्यासारखी वाटते. देशातील 65 कोटी पर्यटक आहेत व 35 कोटी महारा्रातील आहेत असे सर्वेक्षण सांगते. या 35 कोटींनी पहिला महारा्र पाहावा अशी तावरेंची इच्छा आहे. पांडुरंगभाऊ आपल्याला या कार्यात खूप यश मिळो. मुळात ही संकल्पना एवढी चित्तवेधक आहे की सर्वांना एकदा तरी हा अनुभव घ्यावा अशी इच्छा असेलच. या संकल्पनेची संपूर्ण माहिती आपल्याला तावरेजींच्या संकेतस्थळावर मिळेल. www.agrotourism.in मी लवकरच हा अनुभव माझ्या कुटुंबासह घेणार आहे. आपणही घ्या. आणि हो, या संकल्पनेच्या सूत्रधाराशी म्हणजेच पांडुरंग तावरे नावाच्या मॉडर्न शेतकर्याशी संपर्क साधायचा असेल तर 9822090005 वर ते नक्कीच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील. dr.swapnapatker@gmail.com (सदर लेख हा सामना उत्सव प्रसिध्द झाला .)..... |