Advertisement 300 X 250

ऑनलाईन खरेदी-विक्री


रासायनिक खत खरेदी-विक्रीचे व्यवहार १ जानेवारीपासून ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. व्यापाऱ्यांसह परवानेधारक सहकारी संस्थांनाही ही पद्धत बंधनकारक आहे. ऑनलाईन नोंदणीशिवाय खत खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जाणार नाहीत.
जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी संभाजीराव गायकवाड यांनी ही माहिती दिली. जिल्ह्य़ातील सर्व खत विक्रेत्यांनी पंचायत समित्यांच्या कृषी अधिकाऱ्यांकडे त्वरित ३२ कॉलमी नोंदणी अर्ज भरुन द्यावा, त्यासोबत पॅन कार्ड क्रमांक, टिन क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक द्यावा, तसेच खत विक्री परवाना व सर्व मंजूर उगम प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स सादर कराव्यात. याबाबत जिल्हा व तालुका स्तरावर खत कंपन्यांचे प्रतिनिधी व खत विक्रेत्यांना प्रशिक्षणही दिले गेले आहे. ही नोंदणी संगणकावर ७ डिसेंबरपर्यंत अपलोड करायची आहे. डिसेंबर २०११ पर्यंत जिल्ह्यात नोंदणी झालेल्याच खत विक्रेत्यांना यूजर लॉग आयडी व पासवर्ड दिला जाणार आहे. ज्या विक्रेत्यांनी माहिती मुदतीत संगणक प्रणालीवर भरलेली नाही, त्यांना १ जानेवारीनंतर खत पुरवठा केला जाणार नाही. माहिती अपलोड करण्याची जबाबदारी आरसीएफ कंपनीवर सोपवण्यात आली आहे, तसेच खत कंपन्यांना तालुकेही वाटप करुन देण्यात आले आहेत. खत कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्या वितरकांना यासाठी मदत करणार आहेत. सहकारी संस्थांना यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी मदत करतील. संगणकावर माहिती अपलोड करण्याची जबाबदारी खत विक्रेत्यांचीच राहणार आहे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More